नाशिकः साहित्य संमेलनाचा दिवस जसाजसा जवळ येत आहे, तसे-तसे वादाचे पडघम जास्त तीव्रतेने वाजताना दिसत आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी भाजप नेत्यांना ना निमंत्रण नाही, ना त्याचे पत्रिकेत नाव नाही, यावर जोरदार आक्षेप घेतला. भाजप नेत्यांचा निधी चालतो, मग नाव का नाही, असा सवाल केला. राजकारण राहिलं बाजूला. आता थेट संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचीच संमेलनात कथाकथनाऐवजी फक्त संवादावर बोळवण केल्याचे समोर आले आहे. सोबतच ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांचेही नाव अचानक गायब करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे स्वतः साहित्यिक आहेत. जयंत नारळीकरांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या विज्ञानकथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस असे अनेक कथासंग्रह त्यांच्यावर नावावर आहेत. स्वतः संमेलनाध्यक्षांनी आपण साहित्य संमेलनात कथाकथन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, इथे झाले उलटेच आहे.
अन् कार्यक्रमच वगळला
आता साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतून चक्क संमेलनाध्यक्षांचे हे कथाकथनच गायब करण्यात आले आहे. त्याऐवजी त्यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सत्कार सोहळ्यानंतर त्यांचा हा संवाद कार्यक्रम होणार आहे. तिथेही त्यांना फक्त अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आल्याचे समजते. खरे तर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्वतः कथाकथन करणार ही ऐतिहासिक गोष्ट होती. आजवर असे कधीही घडलेले नाही. मात्र, आले निमंत्रकांच्या मना तिथे कोणाचे चालेना, अशी गत सध्या झालेली दिसत आहे.
कोलतेंचेही नाव अचानक गायब
नाशिकच्या साहित्य संमेलनात कला प्रदर्शनाला विशेष जागा देण्यात आली आहे. या प्रदर्शनासाठी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते हे उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून गायब करण्यात आले आहे. याबद्दल चित्रकारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोलते संमेलनात उपस्थितांशी संवाद साधणार होते. स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार होते. मात्र, आता त्यांचे नावच वगळण्यात आल्याने ते संमेलनासाठी उपस्थित राहणार की नाही, याची चर्चा सुरू आहे.
साहित्य संमेलनात राजकीय कलगीतुरा; महापौरांचा बहिष्कार, भाजप नेत्यांची नावे नसल्याने नाराज
फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 442 रुग्णांवर उपचार सुरू; निफाड 95, सिन्नरमध्ये 74 बाधित