मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करावी आणि त्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज दिले. या समाधी परिसराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला असून हे गडकिल्ले दुर्लक्षित होऊ नयेत त्यासाठी त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. या समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचेही निर्देश सभापतींनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल. महाराष्ट्राचा अभिमान, अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. या आराखड्यामध्ये बंधारा आणि त्यावरील घाट विकसित करण्याच्या बाबींचा समावेश करतानाच गुंजवणी नदीच्या उगमाजवळच्या परिसराचे महत्त्व ओळखून त्याचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
समाधीस्थळ परिसराच्या विकासाचे काम हे दोन टप्प्यात करण्यात येईल, पहिल्या टप्प्यात झालेल्या कामांनंतर पुढील टप्प्यांमधील कामे केली जातील असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी राजगडाच्या पायथ्याशी महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाच्या अनुषंगाने श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज स्मारक समिती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. (Funds will be provided for the development of Saibai’s mausoleum area, Ajit Pawar said)
इतर बातम्या
Positivity अशीही! मुंबईत गेल्या महिनाभरात 3 हजार 516 मुलांना कोरोना, मृत्यू एकही नाही..!