Heavy Rain | महापुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांची सुटका, गडचिरोलीतील सोमनूर आणि सोमनपल्ली गावातला थरार

| Updated on: Jul 14, 2022 | 9:29 AM

जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपर्यंत शाळा तसेच आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता 16 जुलैपर्यंत शाळा बंद राहतील, असे आदेश काढण्यात आले आहेत.

Heavy Rain | महापुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांची सुटका, गडचिरोलीतील सोमनूर आणि सोमनपल्ली गावातला थरार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गडचिरोलीः जिल्ह्यातील (Gadchiroli Rain) मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांनाही पूर आला आहे जिल्ह्यातील इंद्रावती (Indrawati river) नदीनेही सततच्या पावसामुळे रुद्रावतार धारण केला. यामुळे सोमनपल्ली सोमनूर या भागात पूरस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील अनेक लहान-मोठ्या घरांमध्ये पाणी शिरलं असून नागगरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. काल बुधवारी स्थानिक प्रशासनाने एक मोठी आव्हानात्मक कामगिरी केली. सोमनूर आणि सोमनपल्ली या गावात पुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना सुखरुप आरोग्यकेंद्रापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे गावकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत.

सिरोंचा तालुक्यातील घटना

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या पुरामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत आहे. येथील इंद्रावती नदीला पूर आल्याने महाराष्ट्राच्या टोकावरती असलेल्या सोमनपल्ली सोमनूर भागात पाण्यानं रुद्रावतार घेतला. मात्र सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी Sdrf पथकाच्या मदतीने तीन गर्भवती महिलांना पुरातून सुरक्षित स्थळी आणलं. या महिलांची नावं पुढीलप्रमाणे-

  • ज्योती सुधाकर गोड्डे
  • लक्ष्मी सुनेश गावडे
  • सपना महेश पिरला

यापैकी सपना पिरला यांची प्रसूती 17 तारखेला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तर ज्योती या सहा महिन्यांची गर्भवती आहेत. या तिघींनाही असरअली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलंय.

16 जुलैपर्यंत शाळा नाही

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागासह शहरातही प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना बाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यातच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपर्यंत शाळा तसेच आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता 16 जुलैपर्यंत शाळा बंद राहतील, असे आदेश काढण्यात आले आहेत. अहेरी, सिरोंचा आणि भामरागड तालुक्यात गंभीर स्थिती आहे. तर गडचिरोली, आरमोरी भागातही मोठा पाऊस सुरु आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून अतिशय आवश्यक काम नसताना बाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.