गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीचे लाचार व्हायचे आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते शिशीर शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्या या मागणीनंतर शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधत आपली बाजू मांडली. मी पक्षविरोधी असं काही केलं नाही. माझं जे काही म्हणणं आहे, ते मी आमच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे, असं सांगतानाच रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय? त्या माझा काय दोष? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रवींद्र वायकर हरले तर त्याचा दोष तुमच्याकडे जाणार नाही का? असा सवाल गजानन कीर्तिकर यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी हे धक्कादायक उत्तर दिलं. वायकर समजा जिंकले काय? आणि हरले काय? माझा काय दोष? काय दोष आहे? अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील आणि पडतील. त्या प्रत्येक ठिकाणी कुणाला ना कुणाला दोष देणार का? असा दोष कुणाला देता येत नाही. राजकीय परिस्थितीनुसार निर्णय होतात. मतदार जे ठरवतो ते होत असतं. इथे हार आणि जीतचा प्रश्न येतो कुठे? प्रेस्टिजचा प्रश्न येतो कुठे?, असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला.
अमोल कीर्तिकर जिंकले तर वडील म्हणून काय वाटेल? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मुलगा जिंकला तर नक्कीच आवडेल. अमोलचं जाऊ द्या. 48 ठिकाणी कोणी तरी जिंकणार, कोण तरी हरणार आहे. त्यात कुणाला आनंद होणार तर कुणाला वाईट वाटणार आहे, असंही कीर्तिकर म्हणाले.
मावळला मी चार पाच दिवस होतो. पार्थ पवार जेव्हा निवडणुकीला उभा होता तेव्हा अजित पवार गटाचे कार्यकर्ते ज्या जोमाने निवडणूक लढत होते, तसं लढताना आता दिसले नाही. त्यामुळे अजितदादा गटावर आरोप झाला असावा. तेव्हा त्यांचा उमेदवार होता. त्यांच्या उमेदवारांना रन करण्यासाठी ते जोरात कामाला होते. तेवढे कदाचित यावेळी नसतील, असं त्यांनी सांगितलं.