राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये नदी पात्रात मासेमारीसाठी गेलेले युवक अडकून पडले आहे. गेल्या 17 तासांपासून 15 युवक पाण्यात अडकले आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु अजूनही त्यात यश आलेले नाही. धुळ्यावरुन SDRF टीमलाही बोलवण्यात आले आहे. मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल यांच्याकडून बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी केली आहे. नदी किनारी बचावकार्य पाहण्यासाठी गर्दी झाली आहे.
चणकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी या दोन्ही धरणांमधून २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु आहे.
मालेगावच्या संवदगाव शिवारात गिरणा नदीत मासेमारीसाठी रविवारी 15 पेक्षा जास्त युवक गेले होते. नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून हे लोक मासेमारी करत होते. त्यावेळी रविवारी सायंकाळी अचानक पाणी वाढू लागले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे काही युवक परत आले. त्यातील 15 युवक त्या ठिकाणी मासेमारी करत थांबले. परंतु पाणी जास्त वाढल्यामुळे ते परत येऊ शकले नाही. ते अडकून पडले. त्या युवकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनातर्फे रविवारीपासून बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे रविवारची रात्र देखील त्या युवकांना नदी किनारी काढावी लागली. नदीची पूर पातळीपासून ही टेकडी जवळपास दहा फूट उंच आहे. यामुळे सध्यातरी या युवकांना धोका नाही.
घटनास्थळी युवकांना काढण्यासाठी मालेगाव अग्निशमन दलाचे पथक पोहचले आहे. तसेच धुळ्यावरुन SDRF टीमलाही बोलवण्यात आले. परंतु नदीपात्रातील अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला अद्याप यश नाही. मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल यांनी प्रशासनाकडे हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. हा जलसाठा नदीपात्रात सोडला जात आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. प्रशासनाकडून नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर काही युवक नदीपात्रात गेल्याने अडकून पडले आहेत.