ST प्रवर्गातून आरक्षण द्या, पडळकरांचा एल्गार; आदिवासी संघटनाही आक्रमक

| Updated on: Sep 20, 2024 | 9:16 PM

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासाठी गोपीचंद पडळकर 23 तारखेला रास्ता रोको करणार आहेत. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जीआर सरकारने काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान त्यांच्या मागणीनंतर आदिवासी संघटनांही आक्रमक झाल्या आहेत.

ST प्रवर्गातून आरक्षण द्या, पडळकरांचा एल्गार; आदिवासी संघटनाही आक्रमक
reservation
Follow us on

मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला आहे. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. 23 सप्टेंबरला धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर राज्य सरकारविरोधात मोर्चा काढणार आहेत. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जीआर सरकारनं लवकर काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी तशी जुनीच आहे. तसंच ST प्रवर्गातून धनगर समाजाच्या आरक्षणाला आदिवासी नेत्यांचा देखील विरोध आहे.
मात्र, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासाठी मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आरक्षण न मिळण्यामागे वेगवेगळे दावे केले जाताय. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण आहे. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आल्याचा दावा धनगर समाजाकडून करण्यात येतो. ‘ड’ ऐवजी ‘र’ असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा करण्यात आलाय. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा समाजातर्फे करण्यात आला आहे.

एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वाढू लागल्यानं राज्य सरकारनं धनगर आणि धनगड हे एक आहेत. यासंदर्भातला जीआर काढण्यासाठी समिती नेमली आहे. याआधी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते., तेव्हाही धनगड आणि धनगर एकच आहेत याच्या अभ्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. मात्र फेब्रुवारी 2024 ला हायकोर्टानं एससी किंवा एसटी प्रवर्गात कुणाला टाकण्याचे वा काढण्याचे अधिकार फक्त केंद्राला आहेत म्हणून दोन्ही याचिका फेटाळल्या. त्यानंतर पुन्हा महायुती सरकारनं धनगड आणि धनगर एक आहे याच्या जीआरसाठी समिती गठीत केली.

सध्या धनगर समाजाला एनटीतून साडे 3 टक्के आरक्षण आहे. मात्र त्यांची मागणी एसटीच्या ७ टक्के आरक्षणात जाण्याची आहे. एनटीतल्या साडे 3 टक्क्यात धनगर ही एकच जात असून २६ उपजातींचा समावेश आहे. एसटीच्या 7 टक्के आरक्षणात शेड्यूल ट्राईब ठरलेल्या 47 जातींचा समावेश केला गेलाय. मध्य प्रदेशसह इतर राज्यात धनगड नावाची जात एसटी प्रवर्गात आहे. त्यावरुन धनगर आंदोलकांचा दावा आहे की, धनगड-धनगर एकच असून ही चूक फक्त शब्दरचनेमुळे झाल्यानं आम्हाला एसटीतून आरक्षण मिळावं. आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे की आमची प्रथा-खाद्यसंस्कृती-चालिरीती धनगर समाजाहून पूर्ण वेगळ्या असल्यानं ते आमच्यात कसे येतात, हे सिद्ध करावं.

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद निर्णाण झाला. दरम्यान आता एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षणाची मागणी जोर धरु लागल्यानं आदिवासी आणि धनगर समाजात देखील वादाची ठिणगी पडली आहे.