गोंदिया : गोंदियात सामाजिक वनीकरणाने तब्बल आठ हेक्टर क्षेत्रामध्ये झाडं लावली. पण, खर्चासाठी निधी उपलब्ध होत नाही. पाण्याअभावी ही झाडं करपली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एकीकडे सामाजिक वनीकरण विभागाकडून पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी हजारो झाडे लावण्यात येतात. मात्र दुसरीकडे झाडांचे संरक्षण करण्यात येत नसल्यामुळे झाडं करपत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील कुडवा (Kudwa) येथे 2014-15 मध्ये आठ हेक्टरमध्ये उद्यान तयार करण्यात आले. उत्तमराव पाटील (Uttamrao Patil) जैव विविधता उद्यान असे नामकरण या उद्यानाचे करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या उद्यानात अशोक वन (Ashok Van), आम्रवन, जांभुवन तसेच देशी प्रजातींसोबतच औषधी वनस्पती लावण्यात आले.
उद्यानाचे मुख्य उद्देश नागरिकांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये वनस्पती प्रजाती आणि वन्यप्राणी यांच्याप्रती आवड निर्माण व्हावी. यासोबतच क्रीडा व्यायाम व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन तसेच याचा प्रसार-प्रसार ही करण्यात यावा. उद्यानावर करोडो रुपये खर्च करण्यात आला. परंतु मागील 2019 पासून उद्यानाची देखभाल करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आली नाही. तर या उद्याचे वीज बिल न भरल्याने वीज कापण्यात आली. त्यामुळे येथील झाडांना पाणी मिळाले नाही. उद्यानामध्ये लावण्यात आलेले हजारो जैवविविधता औषधीय वनस्पती सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वाळून गेली आहेत. अशी माहिती वन मजूर महेंद्र चौधरी व वन उद्यान प्रभारी आर. एन. बल्ले यांनी दिली.
एवढेच नव्हे तर उद्यानात लावण्यात आलेले विद्युत मीटरचे बिल थकीत झाले. त्यामुळे महावितरणने कनेक्शन खंडीत केला आहे. तसेच येथे काम करणाऱ्या मजुरांची साडेबारा लाख रुपयांची मजुरीही देण्यात आली नाही. निधीअभावी या उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात माणसांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचाच मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. असं मत वन मजूर धमदीप टेंभूर्णीकर यांनी व्यक्त केले. जर पाण्याच्या अभावामुळे झाडे करपत असतील शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा नारा फक्त आता कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. मला वाचवा.. मला वाचवा अशी आर्त हाक मुक्या झाडांकडून येत आहे.