नाशिकः नववर्षाच्या पहिल्या दिवशी नाशिककरांना एक अतिशय आनंदाची बातमी. आता त्यांचा नाशिक-शिर्डी प्रवास अवघ्या दीड तासात होणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा सिन्नर-शिर्डी चौपदरी महामार्ग मार्चअखेर खुला होणार आहे. यामुळे मुंबई-शिर्डी अंतरही आपसुकच कमी होईल, यात शंका नाही.
60 किमीचा मार्ग
सिन्नर-शिर्डी हा 60 किलोमीटरचा महामार्ग आहे. याचे काम सध्या जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या मार्च महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष हा प्रकल्प ऑक्टरोबर 2022 मध्ये मार्गी लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, या कामातील अडथळे दूर झाले. त्यामुळे ऑक्टोबरपूर्वीच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
19 गावांची जमीन संपादित
सिन्नर-शिर्डी मार्गासाठी सिन्नर तालुक्यातील 19 गावांमधील जमीन संपादित करण्यात आली आहे. खरे तर नाशिक ते शिर्डी हे अंतर 90 किलोमीटर आहे. मात्र, चौपदरीकरणामुळे हे अंतर कमी होणार आहे. शिवाय नागरिकांचा प्रवासाचा वेळही वाचणार नाही. नाशिक-पुणे महामार्गाला गुरेवाडी भागात हा मार्ग लागेल. शिवाय नगर-मनमाड महामार्गाला सावळीविहीर फाटा येथे हा मार्ग जोडला जाणार आहे.
2 उड्डाणपूल
सिन्नर-शिर्डी महामार्गावर दोन उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहेत. गुरेवाडीनंतर मुसळगाव एमआयडीसीत दोन उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. त्यांची लांबी 500 मीटर असणार आहे. शिवाय दातली, पांगरी, वावी आणि पाथरे येथे भुयारी मार्ग केला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात दर्डे, झगडेफाटा, सावळीविहीरमार्गे ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे भुयारी मार्ग करण्यात येणार असल्याचे समजते.
51 किमीचा पालखी मार्ग
दरवर्षी शिर्डीत साईबाबांच्या चरणी लाखो भाविक आपले मस्तक टेकवितात. या भाविकांची संख्या लक्षात घेता या मार्गावर स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्यात आला आहे. तब्बल 51 किलोमीटरचा हा मार्ग आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातून हा मार्ग जाईल. हा रस्ता गुरेवाडी, मुसळगाव येथून सुरू होतोय. पुढे तो सावळीविहीरपर्यंत पोहचेल. या दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार आहेत. त्यात पांगरी, वावी, खोपडी, मुसळगाव फाटा आणि पाथरे येथे भुयारी मार्ग होणार आहे.