गोपीनाथ गडावर पंकजा, प्रीतम मुंडे, भजन ते रक्तदान, काय काय घडलं?

| Updated on: Dec 12, 2020 | 4:22 PM

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज 72वी जयंती आहे (Gopinath Munde Birth Anniversary program)

गोपीनाथ गडावर पंकजा, प्रीतम मुंडे, भजन ते रक्तदान, काय काय घडलं?
Follow us on

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर यावर्षी सभा रद्द करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला. मात्र, सध्याच्या कोरोना संकट काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी रक्तदान करुन शिबिराचा शुभारंभ केला (Gopinath Munde Birth Anniversary program).

पंकजाताई भजनात तल्लीन

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमितेताने गोपीनाथ गडावर आज भजनाचादेखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या. हातात टाळ घेऊन पंकजा यादेखील भजनात तल्लीन झाल्या (Gopinath Munde Birth Anniversary program).

‘बाबांना जाऊन सहा वर्ष झाले तरी पोकळी कायम’

पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांची अजूनही प्रचंड आठवण येत असल्यातची प्रतिक्रिया दिली.

“गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंती निमित्ताने पहिली प्रतिक्रिया द्यायची झाली तर, खरं सांगायचं तर मुंडे साहेबांची जयंती हा शब्दच मला खटकतो. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची सवय आम्हाला 2014 पर्यंत होती. आता त्याला जयंती हा शब्द लावावा लागतो. हे अनेकांच्या मनातील शल्य आहे. लोकं मला मेसेज करतात 12 डिसेंबर जवळ येतोय ताई पण जयंती म्हणावं लागतंय. मुंडे साहेब नसताना हे करणं हा वेगळा अनुभव आहे. साहेबांना जाऊन सहा वर्ष झाले तरी पोकळी कायम आहे. त्यांचं नेतृत्व खरच कमाल होतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बाबांशिवाय सहा वर्ष कसे गेले?

“बाबांची आठवण क्षणोक्षणी येत राहिली. 2014 पर्यंत मुंडे साहेब असताना ते अत्यंत मोकळ्या मनाचे, सर्वसामान्याना हक्काचा वाटणारा नेता असे वावरायचे. त्यांनी कधीच स्वत:चा वाढदिवस आहे, असा गाजावाजा केला नाही. त्यांनी सत्तेत असताना किंवा नसताना कधीच माझा वाढदिवस मोठा करा असं सांगितलं नाही. कार्यकर्ते आपापल्या मनाने करत होते. साहेबांनी तो वेळ परिवारासोबत घालवला. कधीच त्याचा बाहू केला नाही. त्याच अनुषंगाने आम्ही देखील आमचे वाढदिवसाच साजरी करत नाहीत. पण कार्यकर्तांचा फार आग्रह असतो. साहेब गेल्यानंतर गोपीनाथ गडाची निर्मिती झाल्यापासून गोपीनाथ गड हे स्थान झाले आहे, जिथून लोक ऊर्जा घेऊन जातात. आज त्यांची खूप आठवण येते”, अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.

गोपीनाथ गडावर दिग्गजांची उपस्थिती 

गोपीनाथ मुंडे यांची आज 72 वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, रासप नेते महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार श्वेता महाले, आमदार रत्नाकर गुट्टे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप नेते अक्षय मुंदळा, डॉ. शिलिनी कराड या दिग्गज नेत्यांनी गोपीनाथ गडावरक जावून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.

याशिवाय गोपीनाथ गडावर आज सकाळपासून कार्यकर्त्यांची ये-जा सुरु आहे. सकाळपासून शेकडो मुंडे समर्थक, कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर आले.

अगस्त्याचं व्हिडीओ कॉलद्वारे आजोबांचं दर्शन

गोपीनाथ गडावर खासदार प्रीतम मुंडेंही नतमस्तक झाल्या. प्रीतम मुंडे यांचा सहा वर्षांचा मुलगा अगस्त्य मात्र गडावर येऊ शकला नाही. अगस्त्य मुंबई येथील घरी आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी व्हिडीओ कॉल करून अगस्त्यला आजोबांचं दर्शन दिलं.

संबंधित बातम्या : ‘हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो, हार, सत्कार, सेल्फी काही नको’, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन