ठाणे : 16 सप्टेंबर 2023 | कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी अधिकच्या लोकल गाड्या सोडाव्या यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी याबाबत चर्चा करावी याचे पत्र आम्ही त्यांना दिले आहे. दरवर्षीप्रमाणे कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी कळव्यातून पाच बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. कोकणातील रस्ते व्यवस्थित नाही म्हणून आम्ही जास्त रेल्वे सोडा अशी मागणी केली आहे. कलकत्त्यात देवीचा उत्सव असतो त्यावेळेस 24 तास त्याठिकाणी रेल्वे उपलब्ध होते मग मुंबईत लोकल ट्रेन सेवा का उपलब्ध होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या काळात स्टॅबिलिटी होती, स्थिरता होती. उद्योगधंद्यांना स्थिरता लागते. त्यांच्या काळात कुठे जातीय, धार्मिक तणाव नव्हता. लोकांना धार्मिक, सामाजिक वातावरण शांत लागते. स्थिर लागते. त्यामुळे त्यांच्या काळात उद्योगधंदे जास्त आले. पण हे सरकार आल्यापासून दररोज दंगली होताहेत. तणावग्रस्त वातावरण असतानाही राजकीय नेते हा मोठा की तो मोठा यात रमले आहेत. त्यामुळे इथे न गेलेलं बरं असे उद्योजक म्हणताहेत. उद्धव ठाकरे हे शांत स्वभावाचे होते म्हणून इथे तणाव नव्हता. त्यामुळेच त्यांच्या काळात उद्योजक याठिकाणी जास्त होते.
रामदेव बाबा यांना सर्वांचा मोक्ष दिसत असेल तर ते चांगलं आहे, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तर द्यावे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना का मारलं? तुकारामांच्या गाथा नदीत का फेकल्या? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार का दिला? ज्योतिबा फुलेंना मारण्याचं प्लॅनिंग कोणी केलं? सावित्रीबाईंच्या अंगावर दगड गोटे, शेण कोणी फेकलं? शाहू महाराजांना मारण्याचे प्लॅनिंग कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेबांनी सनातन धर्माविरोधात जाऊन हा धर्म चुकीचा आहे आणि जातीयवाद हा धार्मिक द्वेष पसरवतो. यामुळेच वर्णव्यवस्था जन्माला आली म्हणून मनुस्मृति जाळली. पण त्यांना अडवण्याची कोणाची हिंमत नाही झाली. जर मनुस्मृतिवाद्यांची राज्यव्यवस्था परत येणार असेल तर आमच्यासारख्या लोकांचे काय होणार? असा सवाल आव्हाड यांनी केला.
सोलापूरमध्ये आनंदाचा शिधा घोटाळा झाला. सध्या पैसे कशातूनही खायचे त्याला उत्तर नाही. कोणत्याही गोष्टीचे सरकारला गांभीर्य नाही. महाराष्ट्राला फक्त चॉकलेट देण्याचे काम सरकार करत आहे. मागासवर्गीयांना आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळेच आता कंत्राट भरती सुरू केली. कंत्राटदाराला काही बंधन नसतात. तुम्ही दीड लाख लोकांची भरती करणार आहे पण कसे करणार? इथल्या गरिबांना त्यांना जगूच द्यायचं नाही असे सरकारने ठरवलेले दिसते अशी टीका त्यांनी केली.
राज्यात अनेक ठिकाणी लोकांना पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही. आणि दुसरीकडे शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन फिरत आहे. हा कार्यक्रम म्हणजे शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी टीका त्यांनी केली.