पुणे, कोल्हापूर, नाशिक | 5 नोव्हेंबर 2023 : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी वाद निर्माण झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवड मतदान केंद्रावर दोन गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी एकमेकांना भिडले. मतदान केंद्रातच दोन गटाचे प्रतिनिधी भिडले. सुरुवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने हा प्रकार चिघळला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी हा प्रकार शूट करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना बाहेर काढले. मतदारांना मतदान केंद्रात मतदान करायला सांगण्यावरून दोन्ही गटात वाद झाला. यावेळी शिवीगाळ करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ८९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.
धुळे जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पाडत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम दिसून आला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील वाद मिटवला. या ठिकाणी एका चिठ्ठीवर उमेदवाराने निवडणूक चिन्ह नमूद केल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर दोन गटांमध्ये राडा झाला.
अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी भाजप पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी पैसै वाटप केल्याचा आरोप केला आहे. काटेवाडीत अनेक लोकांना पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माजी सरपंच विद्याधर काटे यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी पुरावे द्या, अशी मागणी केली. मग त्यांनीही पैसे वाटले, असा आरोप मी करु शकतो, असे काटे यांनी म्हटले.
अमरावती जिल्ह्यातील कारला गावातील मतदान केंद्रावर राडा झाला. हा राडा दोन गटांमध्ये झाला असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्र परिसरातून बाहेर काढले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत ग्राम पंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री जीवघेणा हल्ला झाला. इगतपुरी तालुक्यातील धारगाव उमेदवाराचे पती रंजन गोर्धने हे रस्तात उभे असताना हा हल्ला झाला.
सोलापूरच्या टेंभुर्णी गावात मतदारांनी लावलेल्या डिजीटलची सर्वत्र चर्चा रंगली आहे. टेंभुर्णी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी आणि नरसिंह प्रतिष्ठानकडून जागृती करण्यात आली. पैसे वाटप किंवा अन्य आमिष दाखवून मतदान मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.