मुंबईः ग्रामसेवक (Gram sevak) आणि ग्रामविकास अधिकारी ( Village Development Officer) पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्या आहेत.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निरमाण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल. तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे.
नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद-नाशिक, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद-नाशिक, ग्रामसेवक एकनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी यांची सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.