नाशिकः पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेत स्वतः आरती केली. राज्यावरील कोरोनाचे संकट टळू दे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्याचे बळ मिळो, असे साकडे यावेळी देवीला घातले.
नवरात्रोत्सवाने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आणले आहे. येणाऱ्या काळात बाजार अजून कात टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दसऱ्याच्या तोंडावर सोने-चांदी, कपडे आणि बंपर वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांसह सारेच आनंदात आहेत. नवरात्रोत्सवाने तो आनंद द्विगुणित केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गुरुवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्वतः सप्तश्रृंगी देवीची पूजा आणि आरती केली. देवीकडे राज्यावरील कोरोनाचे संकट टळू दे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्याचे बळ मिळो, असे साकडे त्यांनी देवीला घातले. त्यानंतर गड परिसरातील सुविधा, दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कळवणचे आमदार नितीन पवार उपस्थित होते. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात वणीच्या गडावर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे ध्यानात घेता कोरोनाचे नियम कडक पाळले जाणार आहेत. सुरक्षित अंतर ठेवणे, प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. यात हयगय केल्यास प्रशासनाने कारवाईचा इशाराही दिला आहे. विशेषतः भाविकांनी बसचा वापर करावा. जास्त गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रोज 28 हजार भाविकांना दर्शन
सप्तश्रृंगी गडावर रोज 28 हजार भाविकांना दर्शन देवीचे दर्शन घेता येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.
कोरोनाची भीती
नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. एकीकडे सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना शून्यावर जायला तयार नाही. कोरोना नियमांचे पालन सध्या कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. हे पाहता नवरात्रोत्सवात कडक खबरदारी घेणे सुरू आहे.
राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मात्र, त्यांना संकटातून सावरण्याचे बळ मिळो. राज्यावरील कोरोनाचे मळभ दूर व्हावे, अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली.
– छगन भुजबळ, पालकमंत्री
शाळा सुरू केल्यानंतर राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या ठिकाणी सर्वांनी कोरोना नियमावलीचे पालन करून दर्शन घ्यावे. असे केल्यास आपल्याला नक्कीच तिसरी लाट टाळता येईल.
– नितीन पवार, आमदार
इतर बातम्याः
नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!
महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका
हेच का नक्षत्रांचं देणं, सोनं पुन्हा स्वस्त होणं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!
हेच का नक्षत्रांचं देणं, सोनं पुन्हा स्वस्त होणं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!https://t.co/kCVaKXs7n3#Nashik|#BullionMarket|#Gold|#Silver
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021