जळगाव : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर गद्दारीची टीका केली जात आहे. त्यांच्या पक्षातील इतर नेतेही टीका करताना गद्दार म्हणून उल्लेख करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाशी गद्दारी का केली? त्याचे कारण राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी दिले आहे. जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांचे भूमीपूजन करताना केलेल्या भाषणात त्यांनी गद्दारी का केली, हे सांगितले आहे.
काय म्हणाले गुलाबराव
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यावर बोलताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली.
होय, एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली. मग आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.”
आम्ही मराठा मुख्यमंत्री केला मी वेडा आहे का? असा सवाल त्यांनी केला. जे टीका करता त्यांना माझे आव्हान आहे. शरद पवार, शरद पवार काय करतात, मग एकनाथ शिंदे कोण आहे? एक मराठा चेहरा मुख्यमंत्री आम्ही केला. त्यासाठी मी गद्दारी केली. त्यामुळे आपल्या मतदार संघाचा जयजयकार झाला.
यापुर्वी आदित्य ठाकरे यांना घेरले
गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपुर्वीच आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत होता. ते म्हणाले होते की, गेली सात महिने झाले एकच पिक्चर सुरू आहे. लोक आता बोअर झाली आहे, काहीतरी वेगळं करा. आदित्य ठाकरे यांना बोलताना ते म्हणाले, आत्ता जो पक्ष राहिला आहे, त्या पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा असा सल्ला दिला आहे.