जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली. “अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी कुठल्याही प्रकारची भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. फक्त जुन्या योजनांना नवीन करण्याचं काम या अर्थसंकल्पात झाले आहे. बोतल वही है सिर्फ शराब बदल गई है”, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी टोला लगावला आहे (Gulabrao Patil reaction on Budget 2021).
“आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे सरकारी कंपन्यांना खासगी करण्याचा हा डाव आहे. राज्याच्या फक्त नाशिक आणि नागपूर मेट्रो सोडलं तर महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसलं आहे. रेल्वेसाठी ज्या जुन्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्याबाबत काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. रेल्वेच्या रसत्यांसाठी तरतुदी करण्यात आलेली नाही. शेतमजूर, शेतकरी, महिला किंवा नोकरवर्ग यांच्यासाठी काहीही ठोस अशी तरतूद करण्यात आलेली नाही”, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली.
“कोरोनाच्या धर्तीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करण्याचं ठोस आश्वासन दिलं पाहिजे होतं. जेणेकरुन राज्यांची ढासळलेली आर्थिक व्यवस्था रुळावर येऊ शकली असती. पण असं काही काम केलेलं नाही. बोतल वही है सिर्फ शराब बदल गई है”, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढलं (Gulabrao Patil reaction on Budget 2021).
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर, नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कारण येथील निवडणुका लवकरच अपेक्षीत आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी तरतूद केल्याचे दिसून येत नाही. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्रित करुन, केंद्रानं आपलं अपयश, अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.”
“दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांपासून गेल्या करोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महाराष्ट्रासाठी विशेष अशी तरतूद नसल्याने केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने अन्यायच केला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकाचे आर्थिक गणित कोलमडले असतांनाही यावेळी त्याला करात कुठल्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. महिला, शेतकरी, उद्योग, नोकरदार वर्ग, युवा या सार्यांचाच अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे”, असा घणाघात त्यांनी केला.
अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.
महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काय?: आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी अधिकच जास्त गिफ्ट देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
मरणाच्या दारात नेऊन ठेवलं: अजित पवार
कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला