नंदुरबार : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ’50 आमदार एकदम ओक्के, घरी बसवले माजलेले बोके’, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांच्या या टीकेवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, नंदुरबारमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील भाषण करत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली.
“50 आमदार एकदम ओक्के, घरी बसवले माजलेले बोके. इथे आम्ही अनेक शाखांचं उद्घाटन केलं. कलम 307, 302, 151, 107, 110 काय असतात ते आम्हाला माहिती. आम्ही अंगावर शंभर केसेस घेऊन या संघटनेत काम केलं. अरे एसीच्या पठ्ठ्यांनो, मायच्या लाल्यांनो तुमच्यावर किती केसेस आहेत ते आधी सांगा”, असा घणाघात गुलाबरावांनी केला.
“गणेशोत्सव आला की पोलीस, शिवजंयती आली की पोलीस, नवरात्रोत्सव आला की पोलीस. पण जमाना बदल गया है. जे पोलीस आम्हाला शोधायचे तेच पोलीस आता मागेपुढे असतात. आगे गाडी, पिछे गाडी, बिच में बैठा गुलाब गडी”, असं गुलाबराव म्हणाले.
“आमच्यावर विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले 50 खोक्के, एकदम ओक्के! पण पश्चिम बंगालला रेड पडली, 27 कोटी रुपये सापडले. 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागला. आता आम्ही 40 फुटलो. सत्तार साहेब तुम्ही नोटा घेऊन जाण्यासाठी कोणता टेम्पो घेऊन आला होता ते जरा सांगा. आमच्यावर आरोप करता? आम्ही 35 वर्ष आयुष्य शिवसेनेत घातलं. या नंदुरबारच्या खेडा-पाड्यात, धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक गावात शाळा उघडणारा हा गुलाबराव पाटील आहे”, असं गुलाबराव म्हणाले.
“शि म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, स म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे जिथे नामर्दांना स्थान नाही ती मर्दांची संघटना सांगणारा हा गुलाबराव पाटील आहे. खेड्या-पाड्यांमध्ये जाऊन आम्ही शिवसेना उभी केली. मुंबईचे चापुलसी करणारे लोकं म्हणतात की, आम्ही शिवसेनेसोबत गद्दारी केली. आम्ही गद्दारी केली नाही तर शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे काम केलं आहे”, असा दावा गुलाबरावांनी केला.