सोलापूर – शरद पवार (Sharad Pawar) यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची (Brahmins)आठवण आली, यात आनंद आहे. त्याकडे नकारात्मकपणे पाहण्याची गरज नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी केले आहे. ते सोलापुरात सभेनंतर बोलत होते. शरद पवारांनी राज्यातील ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. त्यावर बोलताना त्यांनी सर्वांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे व कोणत्याही समाजाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. असे सांगितले.
पुण्याची ब्राह्मण संघटना जाणार नाही
शरद पवारांनी दिलेल्या बैठकीच्या आमंत्रण नाकारत, या बैठकीला जाणार नसल्याची भूमिका पुण्याच्या ब्राह्मण महासंघाने घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवारांची काय भूमिका आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय या बैठकीला जाणार नसल्याचे पुणे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील इतर काही संघटना या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीने सांगितले महासंघाची भूमिका चुकीची
पुण्यातील ब्राह्मण महासंघाची भूमिका चुकीची असल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे शहारध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याप्रकरणात आनंद दवे यांनी चष्मा बदलला पाहिजे, असे म्हटले आहे. शरद पवार सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जात असतात. असं जगताप यांनी म्हटलंय. यात अमोल मिटकरी यांचं मत हे वैयक्तिक असल्याचेही ते म्हणाले. इतर ब्राह्मण संघटना शरद पवारांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूरच्या सभेत सरकारवर फडणवसींचे टीकास्त्र
सदाभाऊ खोत यांच्या ‘जागर शेतकर्यांचा–आक्रोश महाराष्ट्राचा’ या यात्रेच्या समारोप प्रसंगी फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीसमोर जे प्रश्न आहेत, ते बारमालकांचे,
विदेशी दारुचे दर कमी करण्याचे, शेतकर्यांच्या प्रश्नांशी त्यांना काहीएक घेणेदेणे नाही. वादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा कितीतरी आपत्ती येऊन गेल्या. पण, कवडीची मदत या सरकारने केली नाही. अशी टीका फडणवीसांनी केली आहे. 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतात आणि 3000 कोटी देत नाही. निर्णयानंतर वर्षभर यांचे जीआर निघत नाहीत. जीआर असे काढतात की शेतकर्यांसाठी ‘अडथळ्यांची शर्यत’ तयार होते. कमीत कमी शेतकर्यांना कशी मदत मिळेल, याची आखणी जणू त्यात केली जात, असेही ते म्हणाले.