मुंबई : जगभरातील आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हापूस आंबा लवकरच मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. देवगड हापूसच्या पहिल्या पाच पेट्या देवगडमधून सोमवारी नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यंदाच्या हंगामातील हा अंबा उद्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणार आहे. हंगामातील पहिली पेटी मार्केटमध्ये येणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हापूसच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी हापूसची पहिली पेटी बाजारात फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखल झाली होती. मात्र यंदा महिनाभर आधीच हापूस बाजारात दाखत होत असल्याने, आंबाप्रेमींसोबतच व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाळकेवाडी गावचे शेतकरी अरविंद वाळके यांच्या शेतातील हापूसच्या पाच पेट्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. हा आंबा संप्टेंबरमध्ये फुटलेल्या मोहराचा आहे. यंदा कोकणातील हवामान हे हापूससाठी पोषक होते, त्यामुळे यंदा डिसेंबरमध्येच आंबा मार्केटमध्ये येत आहे. तब्बल पाच वर्षानंतर डिसेंबरमध्ये हापूस आंबा उपलब्ध झाल्याची माहिती वाळके यांनी दिली.
दरम्यान देवगडमधून निघालेला हापूस आंब्याच्या या पेट्या एपीएमसी मार्केटमधील व्यापारी संजय पानसरे यांच्या दुकानामध्ये येणार आहेत. दुकानात हापूसची पहिली पेटी दाखल झाल्यानंतर सर्व आंबा व्यापाऱ्यांच्या वतीने या पेटीची विधीवत पूजा करण्यात येते. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काहीप्रमाणात हापूस आंब्याला बसला आहे. पावसामुळे मोहर गळ्याने आंबा उत्पादनात घट होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आता पहिल्या पेटीला काय भाव मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?
हिला रुग्णावर शारीरिक अत्याचार, अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टर पसार