राम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशीच शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात फैसला होणार, सुनावणीची तारीख समोर

| Updated on: Jan 20, 2024 | 7:56 PM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. येत्या सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. याचदिवशी सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

राम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशीच शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात फैसला होणार, सुनावणीची तारीख समोर
Follow us on

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तसेच त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता दिली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टात येत्या 22 जानेवारीला सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर सुनावणी होणार आहे. हे प्रकरण शिवसेना आमदार अपात्रताशी संबंधित आहे. त्यामुळे या सुनावणीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

येत्या 22 जानेवारीला (सोमवारी) अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोमवारी कोर्टाने सुट्टी जाहीर केली नसल्याने सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण 20 नंबरवर आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सुप्रीम कोर्ट काय निरीक्षण नोंदवणार?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर केला आहे. आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या निकालावर आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवलं होतं. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांच्या नेतृत्वातील सरकार कोर्टाच्या आदेशाने मिळू शकलं असतं, असं कोर्टाने म्हटलं होतं. पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली आहे. त्यांनी यासाठी कायदेशीर बाजूदेखील मांडल्या आहेत. त्यांच्या बाजूने कोर्टात काय युक्तिवाद केला जातो आणि सुप्रीम कोर्टा त्यावर काय निरीक्षण नोंदवतं ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणीदेखील मोठी अपडेट

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी देखील एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षा राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर येत्या 31 जानेवारीपर्यंत सुनावणी घेऊन निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. असं असताना आता 30 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण सुप्रीम कोर्टात करण्यात आलं आहे. जयंत पाटील विरुद्ध विधानसभा अध्यक्ष या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.