नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : सुप्रीम कोर्टात सोमवारी शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावणी पार पडणार आहेत. शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केलीय. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होणार असताना आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबतच्या सर्व चर्चा थांबल्या होत्या. पण आता पुन्हा याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी पार पडली नव्हती. पण आता येत्या सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी दुसरी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. सुनील प्रभू यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह जे. बी. पार्डीवाल आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या याचिकांची 18 आणि 19 असे अनक्रमे नंबर आहेत. त्यामुळे या याचिकांवर एकामागे एक सुनावणी होईल. या सुनावणीत नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली आहे. या पक्षाच्या दोन्ही गटांमध्येसुद्धा आता कायदेशीर लढाईला सुरुवात झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगात येत्या 6 ऑक्टोबरला महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.