महाराष्ट्रातील तापमानात वेगाने बदल होणार आहे. मुंबई पालघरसह कोकणाच्या तापमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढणार आहे. त्याचा परिणाम होऊन या भागातील उकाडा वाढणार आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी काम नसताना घराबाहेर पडू नये, सतत पाणी पिणे, त्रास वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागने केले आहे.
वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेची एक द्रोणीय रेषा दक्षिण तमिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. ही द्रोणीय रेषा विदर्भावरून जाते. तसेच अरबी समुद्रावर एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. या वातावरणाच्या स्थितीमुळे पुढील तीन दिवस विदर्भात तापमानात वाढ होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाटेचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात कमाल-किमान तापमान वाढीसह रात्री उकाडा वाढण्याचाही अंदाज आहे.
एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रवाताच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहे. हे वारे गुजरातवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होईल.
मुंबई महानगर पालिकेने हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १०० च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७० पर्यंत नोंदविण्यात आला आहे. सखोल स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्याने हवेतील धूलिकण कमी होवून वायू गुणवत्ता सुधारल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे काही विभागात महिन्यातून एकदा, तर काही विभागात दोन महिन्यातून एकदा सखोल स्वच्छता राबवली जात आहे.