राज्यात परतीचा पावसाचा धुमाकूळ, पुणे, मुंबईसह अनेक शहरे जलमय

| Updated on: Sep 25, 2024 | 7:27 PM

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होणार आहे.

राज्यात परतीचा पावसाचा धुमाकूळ, पुणे, मुंबईसह अनेक शहरे जलमय
पुणे शहरात मुसळधार पाऊस.
Follow us on

राज्यात पुणे, मुंबईसह सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शहरे जलमय झाली आहे. पुण्यात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटा मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. ज्या-ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहे. नुकसानग्रस्तांना लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंबईत जोरदार पाऊस

नवी मुंबईत परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जुईनगर, बेलापूर, ऐरोली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. बदलापूरमध्ये पावसाचा जोर अचानक वाढला. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथहून बदलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. वाहनचालकांना या पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहेत. सखल भागांमध्येही पाणी साचायला सुरुवात झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावात मुसळधार पाऊस

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची धांदल उडाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहे. या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होणार आहे.

हे सुद्धा वाचा

विदर्भ, मराठवाडा जलमय

विदर्भातील अनेक भागांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे. नांदेड – लातूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे लिंबोटी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सांगलीत अडीच तास वृद्ध पाण्यात

सांगलीच्या मिरज तालुक्यातील पूर्व भागाला मुसळधार पावसाने चांगले झोडपले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. मिरज तालुक्यातील ताणंग येथे पावसाच्या पाण्यामुळे ओढापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. यावेळी या पाण्यात एक वृद्ध वाहत गेल्याची घटना घडली. पुल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात हा व्यक्ती वाहून गेला. परंतु पुढे जाऊन एका झाडाला अडकून बसला. तब्बल दोन ते अडीच तास हा वृद्ध या झाडांमध्ये अडकून बसला होता. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गव्हाणे पोलीस हवालदार यांनी आयुष हेल्पलाइन टीमला मिळाली. त्यांनी तात्काळ आयुष हेल्पलाइन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्या इसमास सुखरूपपणे बाहेर काढले.