औरंगाबाद: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मराठवाड्यात मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह दाखवली आहेत. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हा प्रभाव पुढील 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological department) वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
24 सप्टेंबर – शुक्रवारी मराठवाड्यातील औरंगाबादसह, जालना बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
25 सप्टेंबर – शनिवारी औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं दर्शवली आहे.
26 सप्टेंबर – रविवारी जालना, बीड, उस्मनाबाद आणि लातूसह औरंगाबाद जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
27 सप्टेंबर- सोमवारी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, औरंगाबाद, जालना, बीडमधील वातावरण ढगाळ राहिल. मात्र परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
28 सप्टेंबर – येत्या मंगळवारीही मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना जोरदार वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसू शकतो, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, 12 तासात अजून तीव्र होण्याची व 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे . ह्यामुळे राज्यात पुढचे 4, 5 दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. pic.twitter.com/stBUWKqCQc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 24, 2021
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं यंदा देशात मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहिल असा अंदाज पूर्वी वर्तवला होता. मात्र आता 2021 चा मान्सून देशात लांबणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी दिली आहे. राजस्थानातून यंदा पाऊस उशिरा निघणार आहे. जवळपास 7 ते 8 ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या एक्झिटला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्यानं शेतकऱ्यांपुढं खरिपाची पीकं कशी काढायची असा प्रश्न उभा राहिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी झाले असून सोयाबीन उडीद यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने 2 ते 3 फूट पाणी साचले असून पूर्ण सोयाबीन पाण्यात गेले आहे, एकीकडे सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. संततधार पावसाने किनवट- माहूर तालुक्यातील पांढरे सोने काळवंडलय. कपाशीच्या बोंडाला पावसाचा मार बसल्याने कापूस जाग्यावरच काळा पडलाय, तर काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगांना जागेवर मोड फुटत चालले आहेत.
बीडमधील मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी गावाशेजारून जाणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे
इतर बातम्या-
पांढरं सोनं दिसतंय पण काढता येईना, खानदेशातील शेतकऱ्यांची अवस्था
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश