पुणे: गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणं काठोकाठ भरल्याने आता पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सध्याच्या घडीला 99.94 टक्के पाणीसाठा आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.
खडकवासला धरण पूर्णपणे भरल्याने पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून 5136 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सकाळी 11 वाजल्यापासून तो कमी करुन 2568 क्युसेक्सवर आणण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुळशी धरणात सध्या 94% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी 2000-2300 क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.
भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्यात सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, वाशिम, गोंदिया, गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, भंडारा गोंदिया यलो अॅलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं पालघर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि चंद्रूपर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर बातम्या: