राज्यात गुरुवारी सर्वत्र पावासाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाळली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आहे. पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे. एकंदरीत राज्यातील पावसाचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला आहे.
पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून या भागातील नद्या ,ओढे ,नाले दुथडी भरून वाहत आहे तर जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील खेड,आंबेगाव,जुन्नर येथील घाटमाथ्यावरील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सांगली, ठाणे जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी दिली गेली आहे.
सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावणाऱ्या वर्धा नदीला पूर आला आहे. यामुळे राळेगाव- वरोरा महामार्ग बंद झाला आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून 4 फूट पाणी वाहत आहे. चिंच मंडल , दापोरा येथील नदी काठच्या शेतात पाणी शिरले आहे. सततच्या पावसामुळे गोंदियातील बांध तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्व भागात पावसाची संततधार सुरुच आहे. गेली 8 दिवस नॉन स्टॉप पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे वारणा आणि कोयना पाणलोट परिसरात सतत पाऊस सुरू आहे. चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगली कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 31फूट 8 इंच आहे.
पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्यानंतर आता नदीकाठच्या गावांना फटका बसायला सुरुवात झाली आहे. आंबेवाडीतून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावांना सर्वाधिक फटका बसत आहे.
मागील २४ तासात वरुणराजाने बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात दमदार बॅटिंग केली आहे. तब्बल १५४ मिमी पावसाची नोंद मागील २४ तासात झाली आहे. त्यामुळे कालपर्यंत ५४ टक्क्यांवर असलेला बारवी धरणाचा पाणीसाठा आज ६१ टक्क्यांवर गेला आहे. धरणाच्या पाणी पातळीत २ मीटरने वाढ झाली असून आता धरण भरण्यासाठी ५ मीटर उंची शिल्लक आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसात बारवी धरण भरण्याची शक्यता आहे.
इचलकरंजीमधील पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आले आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. शहरातील बागवानपट्टी शेळके मळा परिसरात पुराचे पाणी येऊ लागले. इचलकरंजी कर्नाटकची जोडणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरासह पवना धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या काही भागांमध्ये पवना नदीचे पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदी काठच्या काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
मुंबईच्या ऊपनगरीत पावसाची दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. इस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवे वाहतूक ठप्प झाली आहे. ‘मॅक्सिमम सिटी’ मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटर राहणार आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८ आणि २४ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलाय.