राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी थेट शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आहे. हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर देशद्रोह्याला पाठिशी घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो, असं गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. विलासराव देशमुख यांनीही चर्चेत सांगितलं होतं. मी आजच या विषयावर बोलत नाही. त्यावेळीही बोललो होतो. मीडियात ते छापून आलं आहे. ज्या गोळीने हेमंत करकरे शहीद झाले होते. ती गोळी कसाबची नव्हती. हे स्पष्ट आहे. मी मनाचं बोलत नाही. मी पुस्तकाचा दाखला देत आहे. हेमंत करकरेंना जी गोळी लागली ती अतिरेक्यांची नव्हती. एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊनच मी म्हटलं आहे. हे चुकीचं नाहीये. त्यांच्या पुस्तकाच्या आधारावर मी हे म्हटलंय. यात जर 50 टक्के असत्य असेल तर 50 टक्के सत्य असेल ना? ती बाजू का मांडली नाही? मी मनाचं बोलत नाहीये. मुश्रीफ यांनी लिहिलंय. मांडलंय. मुश्रीफ यांनी पोलीस तपासाच्या आधारेच हे म्हटलं आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. वडेट्टीवार यांनी पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली आहे. भाजपालाविरोध करण्यासाठी 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला आहे. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपालाविरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहे. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं. आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.