मुंबई : भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Union Home Minister Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत मोठी चुक झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान एक संशयित तरुण अनेक तास त्यांच्याभोवती फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्याने पोलीसांना या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईत अमित शहांचं सुरक्षा कवच तोडणारा हा तरुण महाराष्ट्रातील धुळे(Dhule) जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पोलिसांनी अटक केलेला तरुण धुळ्यातील
हेमंत पवार(Hemant Pawar) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. हेमंत हा मुळचा धुळे जिल्ह्यातील आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ गावचा तो रहिवासी आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचा दावा केला. या पूर्वी हेमंत हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही ब्लेझर घालून फिरताना दिसल्याची माहिती देखील समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 4 आणि 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्याच्या अनुषंगाने अमित शहा यांनी हा दौरा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन देखील घेतले.
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या अनुषंगाने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा आहे. असे असताना हा तरुण त्यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या वावरताना दिसून आला.
अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात संशयास्पदरित्या फिरणारा हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील आहे. त्या ठिकाणी त्याचे आई-वडील आणि भाऊ राहतात. आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचा दावा केला केलाय. मात्र, त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा नेमकं काय काम करतो? कुठे काम करतो? तो मुंबई कसा गेला? याची काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले हे देखील त्यांना माहित नाही. न्यूज चॅनेवरुन ही बातमी समजल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले.