भूषण पाटील, कोल्हापूर : संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. यावेळी दगडफेकदेखील झाली. दोन-तीन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश असताना या संघटनांनी मोर्चा काढला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भात नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे.
कोल्हापुरात दोन गुन्हे दाखल
औरंगजेबचे आक्षेपार्ह स्टेट्सविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारले. सकाळी 11 वाजेपासून शिवाजी चौक परिसरात हिंदूत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केले होते. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
गृहमंत्रालयचे आदेश
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आला, दोषींवर कठोर कारवाई करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. काल एका राजकीय नेत्याने कोल्हापुरात दंगल होऊ शकतो, असे म्हटले. त्यानंतर काही तरुणांनी औरंगजेबचे स्टेट्स ठेवले अन् तणाव निर्माण झाला. या सर्व प्रकाराची चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नितेश राणे यांची मागणी
राज्यात औरंगजेबवरच प्रेम अचानक आलेलं नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्र राज्यात दंगल होणार आहे, असे बोलत आहे, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का? उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्यांना मुगलाईच राज्य आणायचं असेल तर स्वराज्य रक्षणासाठी आम्ही लढायला तयार आहोत, असा टोला राणे यांनी विरोधकांना लगावला.