मुंबई : विद्यार्थी आंदोलनामुळे (Student protest) हिंदुस्तानी भाऊ सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. धारवीतलं आंदोलन भाऊला (Hindustani Bhau) चांगलच भोवलं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमा होत हजारो विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. या आदोलनाआधी हिंदु्स्तानी भाऊ आंदोलनस्थळी आला होता. त्याला पोलिसांनी तिथं थांबू दिलं नाही, मात्र हिंदुस्तानी भाऊ तिथून गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला. आंदोलनपूर्वीचे काही व्हिडिओही (Hindustani Bhau video) पोलिसांच्या हाती लागले. हे आंदोलन हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडिओंमुळे भडकले असल्याचा आरोप आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही या आंदोलमागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी वेगाने तपास करत हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेतलं. सुरूवातीला त्याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली. आज हिंदुस्तानी भाऊची कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं, त्यानंतर न्यायालयाने हिंदु्स्तानी भाऊचा कोठडी मुक्काम आणखी वाढवला आहे.
हिंदुस्तानी भाऊचा कोठडी मुक्काम वाढला
धारावी विद्यार्थी आंदोलन प्रकरणात हिंदुस्तानी भाऊची कोठडी आणखी एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊचा पाय आणखी खोलात रुतला आहे. सोमवारी अचनाक मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर घेराव घातला. हे आंदोलन एवढं तीव्र होतं की पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कसे जमले ? कुठून आले हे विद्यार्थी याचा शोध घेत असताना पोलिसांना हिंदुस्थानी भाऊचं नाव कळलं. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला ताब्यत घेतलं आहे.
उद्या पुन्हा कोर्टात हजर करण्याची शक्यता
आंदोलन भडकवणारी आणखीही काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याला आणि इतर काही लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे. सोशल मीडियाद्वारे चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली होती, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. हिंदुस्तानी भाऊची एकच दिवसाची कोठडी मिळाल्याने हिंदुस्तानी भाऊला पोलीस उद्या परत कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.