हिंगोली : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हिंगोलीमध्ये कारमधून एकाच कुटुंबातील तिघे जण वाहून गेले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा तीन वर्षांचा चिमुरडा अद्याप बेपत्ता आहे. पतीला कारमधून बाहेर पडण्यात यश आल्यामुळे त्याचा जीव वाचला.
हिंगोली जिल्ह्यात काल (रविवारी) रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथून नातेवाईकांना भेटून पडोळ दाम्पत्य आपल्या मुलासह घरी निघाले होते. मात्र परत जाताना त्यांची कार गोळेगाव येथील पुलावरुन वाहून गेली.
नेमकं काय घडलं?
अपघातातून पती योगेश पडोळ हे काही अंतरावर बाहेर निघाले, मात्र त्यांची 38 वर्षीय पत्नी वर्षा पडोळ आणि 3 वर्षांचा मुलगा श्रेयन हे दोघे रात्रीच वाहून गेले होते. घटनास्थळावरुन काही अंतरावर वर्षा पडोळ यांचा मृतदेह आज (सोमवारी) सकाळी सापडला आहे, तर श्रेयन अद्यापही बेपत्ता आहे. पडोळ कुटुंबीय औंरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मॅक्स जीपही वाहून गेली
दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कायाधु नदी भरुन वाहत असल्याने नदीचे पाणी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुलावरुन वाहत होते. नांदेड-हिंगोली महामार्गावरील रात्री वाहनसेवा काही वेळ ठप्प झाली होती. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात ओढ्याला पूर आल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाजीपाला विक्री करुन येणाऱ्या शेतकऱ्याची एक मॅक्स जीप वाहून गेली. त्यातील दोघे जण सुखरुप बाहेर निघाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
हिंगोलीत कार बुडून चौघा शिक्षकांचा अंत
दरम्यान, हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये गेल्या महिन्यात चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही काम सुरु असल्याने रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली.
पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे भरधाव कार वेगाने जाऊन खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडल्यानंतर लगेच लॉक झाली. पाण्यात बुडलेल्या गाडीतून बाहेर पडता न आल्यामुळे चारही जणांचा गाडीतच गुदमरुन करुण अंत झाला.
संबंधित बातम्या:
कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, गाडी लॉक झाली, पाण्यात बुडून चौघांचा अंत
Hingoli Accident | चौघा शिक्षकांच्या मृत्यूला कारणीभूत, हिंगोलीतील ‘त्या’ ठेकेदाराविरोधात गुन्हा
(Hingoli Car Drown in Flood Water Wife Dies Son Missing Husband Saved)