प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा गणपती करु. मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू, असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या योजनांवरुन बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समुद्रात टाकण्याचा इशारा दिला. “आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु. त्यांना उचलून समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे आणि आशीर्वाद पाहिजेत”, असं बच्चू कडू म्हणाले. ते हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना समुद्रात टाकण्याची भाषा करणाऱ्या बच्चू कडू यांनीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना लाडके मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता.
“आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय. अजूनही तुम्हाला आमच्याकडून कामे करून घ्यायचे असतील तर प्रहारचे सर्वाधिक जास्त आमदार विधानसभेत पाठवा. आम्ही मुख्यमंत्र्याचा ही गणपती बनवू आणि समुद्राच्या पाण्यात टाकू”, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केलीय. कळमनुरी येथील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते.
“कलेक्टरला घेऊन जाणाऱ्या चालकाला 45 हजार पगार, इकडे एसटीचा चालक 50 – 50 जण घेऊन जातोय. त्याला मात्र केवळ 12 हजार पगार आहे. हे तर फार चुकीचं आहे. यह नहीं चलेगा साहब, इधर बच्चू कडू अभी जिंदा है”, असा टोला बच्चू कडू यांनी सरकारला लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कळमनुरी येथे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा सपन्न झाला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढणार नाहीत. नाही केल्या तर लढू. आम्ही 25 जणांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. आम्ही दोन जागा जाहीरही केल्या आहेत, असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.
“आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे 9 तारखेला लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणार आहोत. आमची तिसरी आघाडी नाही. आमची शेतकरी, शेत मंजुरांची आघाडी आहे. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढणार नाहीत. मग आमची गरज काय? मागण्या मान्य केल्या तर आम्ही निवडणुका लढवणार नाहीत, नाही केल्या तर लढू. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या. दोन वर्ष मुदद्लमध्ये आणि व्याजात सवलत द्यावी. पेरणी ते कापनीपर्यंत सगळी कामे MRGS मधून व्हावी. सगळी काम करणारे घटक आहेत. या सगळ्यांसाठी योजना प्रॉपर आणावी. पैसे नसतील तर 40 एकरमधील राज्यपालांचा बंगला विकावा. 40 एकरमध्ये राज्यपालाच्या बंगल्याची गरज नाही. ते विकून 1 लाख कोटी मिळतील”, असं बच्चू कडू म्हणाले.