बाप आहे की कसाई? पोटच्या लेकरावर गोळी झाडली, पत्नीला संपवलं, सासू आणि मेहुण्यावरही गोळीबार

| Updated on: Dec 26, 2024 | 5:40 PM

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत त्याने आपल्या मुलावर, सासूवर आणि मेहुण्यावरही गोळीबार केला. पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

बाप आहे की कसाई? पोटच्या लेकरावर गोळी झाडली, पत्नीला संपवलं, सासू आणि मेहुण्यावरही गोळीबार
पोलिसांचा तपास करतानाचा फोटो
Follow us on

आपण कुठल्याही परिस्थितीतून, अडचणीतून किंवा भांडणांमधून जात असलो तरी आपल्यातली माणुसकी संपायला नको. आपल्यातील संवदेशील स्वभावाचा कधीच अंत व्हायला नको. आपण सुद्सदविवेक बुद्धीने विचार करुन वागायला हवं. कारण आपण रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं, हिंस्त्र वागलो आणि त्यामुळे इतरांना इजा झाली, कुणाचा जीव गेला तर त्यापेक्षा वाईट वागणं कोणतंच असू शकत नाही. अशा वागणुकीतून आपण आपल्यातलं माणूसपण संपवून टाकतो, आपल्यातील सृजनशीलतपा संपवून टाकतो आणि आपणच आपल्यामध्ये हैवानाला जन्म देतो. हा हैवान जे करतो त्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. हिंगोलीत असाच काहीसा प्रकार बघायला मिळाला आहे. पोलिसाची नोकरी करणारा एक कॉन्स्टेबल आपल्याच पत्नीची गोळ्या झाडून हत्या करतो. तो इतक्यावरच थांबत नाही तर तो पोटच्या लेकरावरही गोळी झाडतो. त्याच्या सासरच्या मंडळींवर सासूवर आणि मेहुण्यावर गोळी झाडतो. या घटनेमुळे हिंगोली जिल्हा सुन्न झाला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याकडून हे अपेक्षित नाही, अशी भावना जनमाणसात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात संबंधित घटना घडली आहे. वसमत शहरात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल विलास मुकाडे याने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. तसेच पोटच्या मुलावर, सासूवर आणि मेहुण्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात तीनही जण गंभीर जखमी झाले आहेत. तर त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात विलास मुकाडे याचे सासू-सासरे कुटुंबासह वास्तव्यास होते. तिथे त्याची पत्नीदेखील गेली होती. मयूरी मुकाडे असं त्याच्या पत्नीचं नाव होतं. दोन्ही पती-पत्नींमध्ये सातत्याने होत असलेल्या भांडणांमुळे गोष्ट घटस्फोटापर्यंत येऊन ठेपली होती. सततच्या भांडणामुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला आणि त्याच वादात विलास मुकाडे याने गोळीबार केला.

आरोपीने चार राऊंड फायर, कुणाकुणावर निशाणा?

आरोपी विकास मुकाडे याने चार राऊंड फायर केल्या. त्याने पहिली गोळी आपल्या पत्नी मयुरीवर झाडली. या गोळीबारात मयुरी हिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी गोळी त्याने आपल्या पोटच्या अवघ्या दोन वर्षाच्या मुलावर झाडली. त्याच्या मुलाच्या पायाला ती गोळी लागली. तिसरी गोळी आरोपीने आपल्या सासूवर झाडली. सासूला पोटात ती गोळी लागली. तर चौथी गोळी आरोपीने मेहुण्यावर झाडली. त्याच्या बरगड्यांमध्ये ती गोळी गेली.

हे सुद्धा वाचा

तीन जण बचावले

या गोळीबारानंतर आरोपी हा फरार झाला. तर दुसरीकडे जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण आरोपीची पत्नी मयुरी हिचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तीन जण या घटनेत बचावले आहेत. आरोपीचा मुलगा, सासू आणि मेहुणा यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यानंतर लगेच तपासाला सुरुवात केली. अखेर घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिक्षक कृष्णा कोकाटे यांनी दिली आहे.