Manoj Jarange Patil Maratha Reservation Movement : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून शांतता जनजागृती रॅली काढली जाणार आहे. याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सुरुवात आजपासून होणार आहे. अंतरवाली येथील उपोषणस्थळी ग्रामदेवाचे दर्शन करुन जरांगे पाटील हे दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवस काम बंद ठेऊन आपली ताकद दाखवा, असे आवाहन संपूर्ण मराठा समाजाला केले आहे.
“मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा. येत्या १३ जुलैपर्यंत रॅली असेल. त्यामुळे एक दिवस काम बंद ठेवून आपली ताकद दाखवा. एकट्याच्या आणि सर्वांच्या लढण्यात खूप शक्ती असते. आपल्या मुलांसाठी आपल्याला लढावे लागेल. त्यामुळे या रॅलीत सर्वांनी शक्ती दाखवा”, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
“हैद्राबाद गॅझेट, सगे सोयरे यांच्याबाबतीत अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. चर्चा झाल्याशिवाय प्रश्न मार्गी लागत नाही. मी कृती आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो. सगे सोयरे कायदा आमच्या व्याख्येप्रमाणे करा. हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट स्वीकारा”, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
“288 उमेदवार उभे करायचे की पडायचे हे समाजाची बैठक घेऊन ठरवू. राजकीय इच्छाशक्ती असेल तर 2 तासातच सर्व प्रश्न मार्गी लागेल. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सध्या शेती कामे वेगाने सुरू आहे. त्यामुळे रॅलीसाठी कमी लोक दिसतील. शंभुराजे देसाई यांच्याशी मी फोनवरून रात्री बोललो त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत की त्यांनी कामाला वेग दिला आहे. तसेच मुंबईतही जोरदार रॅली होईल”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे. ही रॅली 5 टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. हिंगोलीनंतर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन केले जाईल.