हिंगोली | 20 ऑक्टोबर 2023 : देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका आहेत. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. असं असताना हिंगोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रेवशबंदी करण्यात आलीय. त्यामुळे सर्वपक्षीय पुढाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झालीय. राजकीय नेते हे वेगवेगळ्या घडामोडींवर, घटनांवर भूमिका मांडत असतात. ते समाजातील जटील प्रश्नांवावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतात. पण आता हिंगोली जिल्ह्यातील काही गावांनी या राजकीय नेत्यांवरतीच बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आलाय.
हिंगोली जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गाव खेड्यात एंट्री नाही, असं ठरवण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात 50 पेक्षाही जास्त गावांच्या वेशीवर राजकीय पुढाऱ्यांना गावात एंट्री नसल्याचे बॅनर लागले आहेत. विशेष म्हणजे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच गावात नो एन्ट्रीचे बॅनर लागल्याने राजकीय नेते पेचात पडले आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मोठी कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी 17 दिवस उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे सरकार हादरलं. मोठमोठ्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची नोंद घ्यावी लागली. आता जरांगे यांच्या राज्यभरात सभा होत आहे. जरांगे यांनी सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत संपत आली आहे. पण सरकारकडून ठोस अशी कोणतीही हालचाल करण्यात आल्यात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या 22 ऑक्टोबरला जरांगे पाटील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्याआधीच गाव-खेड्यांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी घालण्यात आलीय.