हिंगोली: जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमधील एका कॉन्स्टेबलचा अत्यंत दुर्दैवी (Death of constable) असा मृत्यू झाला. एका कामासाठी गाडीतून प्रवास करत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीला हादरे बसले. या हादऱ्यांमुळे जवानाच्या हातातील रायफलची गोळी सुटून ती थेट त्याच्या छातीत घुसली. ही घटना घडल्यानंतर जवानाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमध्ये पप्पाला भानूप्रसाद हे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. 35 वर्षीय पप्पाला हे मूळ आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना हा अपघात घडला.
पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पप्पाला भानूप्रसाद हे डिपार्टमेंटच्या गाडीत हैदराबादहून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी नांदेडकडे रवाना झाले होते. चालक आणि जवान गाडीतून जात असताना डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. डोंगरकडापासून तीन किमी अंतरावर ही घटना घडली. रस्त्याचे काम सुरु असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात गाडी आदळल्याने जवानाच्या ‘इंसास रायफल’ मधून गोळी सुटली. ती थेट जवानाच्या छातीत घुसली. जवानाला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
इतर बातम्या-