हिंगोली | 19 ऑगस्ट 2023 : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी बस कंडक्टरची तक्रार केली. बस कंडक्टर विद्यार्थ्यांशी अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. “मुली आहात म्हणून सोडतो. नाहीतर तुम्हाला ठोकलं असतं”, अशी धमकी कंडक्टर देत असल्याची तक्रार विद्यार्थीनींनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची तक्रार ऐकून घेतल्यानंतर संतोष बांगर यांनी बस आगारातील अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं.
“मुली ज्या पद्धतीने बोलत आहेत, तिथे कोण कंडक्टर आहे, तो म्हणतो की, तुमच्या बापाची बस आहे का, बसमधून खाली उतरवतो. अशा कंडक्टरला मी खरंच सांगतो पायाखाली तुडवेन. तुम्हाला माझ्या स्वभावाची कल्पना आहे. मी जेवढा चांगला आहे, तेवढाच खराब आहे. मला कमी-जास्त वाटलं तर मी त्याला मारेन. मला काहीच सांगू नका”, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं.
“चांगला माणूस कंडक्टर द्या. लेडीज द्या किंवा वयस्कर व्यक्ती द्या. त्याला समज असली पाहिजे. बारीक मुली, लेकरं आहेत. त्यांची गैरसोय व्हायला नको”, असं आमदार संतोष बांगर यांनी आमदारांना सांगितलं. यावेळी विद्यार्थीनी देखील तक्रार करत होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन संतोष बांगर यांना दिलं.
संतोष बांगर याआधी देखील अधिकाऱ्यांना अरेरावी करण्यावरुन चर्चेत आले होते. त्यांनी याआधी सरकारी कर्मचाऱ्यावर कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाणदेखील केली होती. याशिवाय त्यांची एका डॉक्टरला बिलावरुन फोनवर शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती.