होळीचा सणाला वेगळेच महत्व आहे. परंतु हा सण साजरा करण्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. बंजारा समाजामध्ये होळी आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. विविध प्रकारचे गीत गाऊन त्यावर नृत्य केले जाते. दिवाळीसारखा जल्लोष बंजारा समाज होळीला करत असतात. परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वेगळीच होळी साजरी केली जाते. ही होळी रंगा लावून नाही तर एकमेकांवर दगडांचा मारा करुन साजरी करतात. त्यानंतर दगडांच्या माऱ्यात जखमी झालेल्या लोकांना डॉक्टरांकडे नेत नाही. त्यांना मंदिरात नेले जाते. विशेष म्हणजे ही ४०० वर्षांची परंपरा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भोयरे हे गाव आहे. या गावात दगडाची अनोखी होळी खेळली जाते.
भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे.
गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर दुसरा गट गडाच्या पायथ्याशी असतो. दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत असतात. मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
दगडांची होळी खेळताना गावाकऱ्यांना दगड लागला तरी उपचार केले जात नाहीत. जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा केला जातो. या दगडफेकीत अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड-गोटे जमा करतात. संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात.
जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते, त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. या अनोख्या होळीची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होत असते. गावात या महोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळाला.
श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये होळी या सणाला एक पारंपरिक वारसा लाभला आहे. भिमाशंकर देवस्थान आणि आदिवासी बांधव प्राचीन काळापासून परंपरेप्रमाणे एकत्रित येऊन भिमाशंकरच्या कोकण कड्यावर होळी पेटवली जाते. पुरणपोळीचा नैवद्य देऊन नारळ वाहिला जातो. विशेष म्हणजे या होळीत लाकूड-फाटा न जाळता फक्त पालापाचोळा आणि शेणाच्या गोव-या पेटवून इकोफ्रेंडली होळी साजरी केली जाते.