सिंधुदुर्ग : “भाजप खासदार नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले (Amit Shah speech at Narayan Rane lifetime medical college opening).
अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. सिंधुदुर्गातील कार्यक्रम हा हॉस्पिटलचा जरी असला तरीसुद्धा त्याकडे मोठं राजकीय महत्त्वही आहे. राज्यात ऑपरेशन लोटसची असलेली धास्ती, राणेंनी आघाडी सरकारविरोधात उघडलेला मोर्चा, फडणवीसांची फासे पलटवण्याची भाषा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातल्या कार्यक्रमाची चर्चा राज्यभर आहे (Amit Shah speech at Narayan Rane lifetime medical college opening).
“सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. या भूमीकडून प्रचंड चेतना मिळते. कारण याच भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचा संस्कार दिला आहे. जेव्हा मुघलांचं राज्य होतं, औरंगजेबाचं राज्य होतं, तेव्हा चहुबाजूने अंधार होता, कुठेही प्रकाशाची चिन्ह दिसत नव्हतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा करत संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून सुरु झालेली ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सुरु आहे. आता मोदींच्या नेतृत्वात भारताला विश्वात नाव कमवायचं आहे. शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे साहस केलं. त्यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. अनेक पराक्रम केले. आपल्या जीवाची बाजी लावून ते स्वधर्मासाठी लढले. भारतात सर्वात आधी नौसेना बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमीत केलं”, असं अमित शाह म्हणाले.
महाविकास आघाडीवर निशाणा
यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ऑटो रिक्षाची सरकार बनली, ज्याचे तीनही चाकं वेगवेगळ्या दिशेने चालत आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने चालतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणारा होता”, असा दावा त्यांनी केला.
“ते म्हणतात, आम्ही वचन मोडलं आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसं. अशाप्रकारे खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांना वचन दिलं होतं. त्यांनी जनादेशानुसार भाजपचा मुख्यमंत्री बसवा, असा आग्रह केला. पण आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं”, असं अमित शाह म्हणाले.
“ते म्हणतात, एका बंद दराआड खोलीत चर्चा झालीय. मी वचन दिलेलं. मी कधीच खोलीत चर्चा करत नाही. जे आहे ते सर्व सार्वजनिक करतो. मी कधीच खोलीचं राजकारण केलं नाही. मी तसं कुठलंच वचन दिलं नाही”, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
“तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत टाकून ते सत्तेवर बसले आहेत”, असा घणाघात त्यांनी केला.
हेही वाचा :
बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका
राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात; फडणवीसांची स्तुतीसुमनं