बीड | 5 नोव्हेंबर 2023 : बीड जिल्ह्यात 30 तारखेला ज्या पद्धतीने घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. आजपर्यंत इतिहासात असे कधीही झाले नव्हते. ऑडिओ क्लिपच्या अर्थाचा अनर्थ करण्यात आला आणि अशी दुर्दैवी घटना घडली. आरक्षणाची अनेक आंदोलने या देशाने पाहिली आहे. मात्र, असा घरावर हल्ला करण्याचा अनर्थ कधीच झाला नाही. या घटनेचं जाहीर निषेध आहे. यामागे मोठं षडयंत्र दिसून येते. ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून वितुष्ट करण्यात आले. कोण कुठल्या समाजाचे आहे हे पाहून घर पेटविली, यात मोठं षडयंत्र आहे, असा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.
जिल्ह्यातलं राष्ट्रवादी भवन जाळलं. क्षीरसागर यांचं घर जाळलं, ऑफिस जाळलं. सुभाष राऊत यांचे संपूर्ण हॉटेल जाळलं. भाजप, शिवसेना, आरएसएसचे कार्यालय फोडले. हे सगळं काही ठरवून केलं गेलं. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी बीड जिल्ह्याची मागणी आहे. लोकप्रतिनिधी यांचे घर ठरवून जाळले गेले. यातील मास्टर माईंड कोण आहे हे शोधण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे असेही मंत्री मुंडे म्हणाले.
बीडमध्ये झालेल्या या घटनेची एसआयटीकडून तपासणी झाली पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. हल्ला करणारे पेट्रोल बॉम्ब, हत्यार सोबत घेवून आले होते. ज्यांनी कुणी हे केलं त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. घटना अचानक घडली म्हणून पोलीस बळ विभागल गेलं. हे पूर्वनियोजित ठरलेलं होतं. गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना भेटून सर्व प्रकाराची कुक्षी करावी अशी मागणी करणार आहे. इथे प्रशासनाला अपयश मिळाले अशी टीकाही त्यांनी केली.
बीडच्या या घटनेत अनेक आंदोलन जखमी झाले. मात्र, त्यांच्यावर इलाज कुठं झाला हे कोणालाच माहीत नाही. कोणाच्या घरात त्यांच्यावर उपचार झाले हे पहावे लागेल. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. हल्ले करताना घरांना क्रमांक देण्यात आले होते. यात जो कोणी सहभागी आहे त्याला शिक्षा होणारच आहे. प्रकाशदादा यांनी जे म्हंटले ते खरंही असेल. त्यासाठीची एसआयटी चौकशीची मागणी करत आहे असे मंत्री मुंडे म्हणाले.