मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (gunratna sadavarte) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता वेगळी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे (msrtc) वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या कामगारांसोबत एका उद्यानात बैठक घेतली. त्यानंतर मध्यरात्री सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवरती बैठक झाली. त्यात सदावर्ते यांच्या पत्नी, अॅड. जयश्री पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक आंदोलन करण्याची चिथावणी दिली. या बैठकीला सदावर्तेंना नागपूरहून फोन करणारा व्यक्ती होता. हा व्यक्ती आंदोलनातही होता. त्याचा तपास लागला आहे, अशी धक्कादायक माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात दिली. या प्रकरणी जयश्री पाटील यांनाही सहआरोपी करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांना (police) अजून तपास करायचा आहे. त्यामुळे सदावर्ते यांची कोठडी सात दिवसाने वाढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली असून पवारांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचंही स्पष्ट होत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी आज संपल्याने त्यांना आज पुन्हा कोर्टात आणण्यात आलं. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तीवाद केला. तसेच या प्रकरणातील धक्कादायक माहितीही घरत यांनी कोर्टाला दिली. पवारांच्या घरावरील हल्ल्यापूर्वी गार्डनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीला सदावर्तेही उपस्थित होते. त्यानंतर 7 एप्रिल रोजी सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर बैठक झाली. मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटाने ही बैठक पार पडली. यावेळी जयश्री पाटील यांनी आक्रमक आंदोलन करण्यास भाग पाडलं. या प्रकरणात जयश्री पाटील यांना 80 लाख रुपये मिळाले. जयश्री पाटील फरार आहेत. त्यांनाही सहआरोप करण्यात आले आहे. त्यांचीही चौकशी करायची आहे, असं घरत यांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार सदावर्ते यांच्या घरात एक डायरी सापडली आहे. या डायरीत पैशाच्या देवाणघेवाणची माहिती आहे. त्याचाही पोलिसांना तपास करायचा आहे. शिवाय सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना तपासायचे आहेत, असं घरत यांनी कोर्टाला सांगितल्याचं कळतं.
सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने एसटी कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख नव्हे तर 2 कोटीहून अधिक रक्कम जमा केल्याचं घरत यांनी कोर्टाला सांगितलं.
दरम्यान, सिल्व्हर ओकवरील आंदोलनाचं नेतृत्व केल्याप्रकरणी अभिषेक पाटील याला अटक करण्यात आली आहे. तसेच पुण्यातून चंद्रकांत सूर्यवंशी या युट्यूब चॅनेलच्या रिपोर्टरलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे जबाब नोंदवायचे आहेत, असंही कोर्टाला सांगण्यात आलं.
संबंधित बातम्या: