दिल्लीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) न भूतो न् भविष्यती असा विजय मिळवला. विशेष म्हणजे या दोन्ही कामगिरी पक्षाच्या उदयानंतर फक्त 7 वर्षांत केल्या. मात्र, गेल्या 16 वर्षांपासून उदयाला आलेल्या आणि अगदी काल म्हणजे 9 मार्च रोजी वर्धापन दिन साजरा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंना (Raj Thackeray) हे काही जमले नाही. याचे कारण काय, याचाच शोध घेण्याचा हा प्रयत्न. खरे तर कुठलाही नवा राजकीय पक्ष जनतेसाठी एक आशेचा किरण असतो. तसेच मनसेबाबत म्हणावे लागेल. त्यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सुरुवातीला 13 आमदार निवडून दिले. त्यानंतर नाशिकसारख्या महापालिकेची सत्ता ताब्यात आली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) विस्कटलेली घडी काही गेल्या नीट बसताना दिसत नाही.
‘आप’ने वेगळे काय केले?
शिवसेनेमधील अंतर्गत कलहामुळे राज यांनी वेगळा राजकीय संसार थाटला. 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्याच वर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले. 2009मध्ये 13 आमदार विजयी झाले. मात्र, त्यानंतर सुरू झालेली पिछेहाट काही केल्या थांबायला तयार नाही. 2014 आणि 2019 मध्ये ही संख्या एका आमदारावर आली. विशेष म्हणजे आप आणि मनसे सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेतात. त्यांचे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न उचलतात. मात्र, यश आपच्या पारड्यात अपयश मनसेच्या पारड्यात. कारण आप कुठलेही प्रश्न तडीस नेतो. मनसे त्यात कमी पडताना दिसते. आपने दिल्लीमध्ये वीज, पाणी, शाळा हे प्रश्न पोटतिडकीने मांडले. त्याच्याच बळावर आता पंजाबमध्ये सत्ता काबिज केली.
कल्पकतेची कमतरता?
अरविंद केजरीवाल लोकांना स्वप्न दाखवतात. त्यातली अनेक पूर्णही करतात. मात्र, हेच मनसेला जमत नाही. मनसेचे प्रमुख राज ठाकरेंची ब्लू प्रिंट सर्वांना माहित असेल. मात्र, लोक तिला भुलले नाहीत. नाशिक वगळता इतर महापालिकेतही त्यांना सत्ता मिळाली नाही. आता नाशिकमध्येही पुन्हा सत्तेत येणे अवघडय दिसतेय. शिवसेनेतील अनेकजण या पक्षात आले. मात्र, संधी मिळताच त्यांनी मनसेकडे पाठ फिरवली.
नियोजनात मागे?
अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये पक्षाची बांधणी चांगली केली. तिथे पाया पक्का केल्यानंतर पंजाबकडे वळले. तिथेही त्यांनी योग्य नियोजन केल्याचे दिसले. मात्र, राज ठाकरे कधी विकास, कधी हिंदुत्व आणि कधी मराठीच्या मुद्याचे राजकारण करत राहिले. आपण इतर पक्षांना सक्षम पर्याय आहोत, हे त्यांना मतदारांच्या मनावर बिंबवता आले नाही. तशी मार्केटिंग करणे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेला जमले नाही. त्यामुळे मनसेपेक्षा आपचे राजकीय वय निम्मेही नाही. मात्र, यश अफाट असेच म्हणावे लागेल.
Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने गाठली मॅजिक फिगर, सपाची शतकी खेळी
Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…