मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटानं महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील 1 जागा अशा एकूण 19 जागांवर दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचीही बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांकडून, लोकसभेच्या जागांची चाचपणी सुरु झालीय. राष्ट्रवादीच्या बैठकीत गेल्या वेळी लढलेल्या 19 जागांचा आढावा घेण्यात आला. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रस्ताव मागवल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.
2019 मध्ये लढलेल्या लोकसभेच्या 19 जागांचा आढावा राष्ट्रवादीनं घेतलाय. सध्याची परिस्थिती आणि कोण इच्छुक आहेत, त्याचीही माहिती घेण्यात आलीय. 2019 मध्ये ज्या 18 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. त्या 18 जागा आम्ही पुन्हा निवडून आणणार, असं ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे आम्हीच मोठे भाऊ असल्याचं म्हटलंय.
ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे. तर ठाकरे गटाची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी युती आहे. त्यामुळे वंचितचा मविआत समावेश झाला नसला, तरी ठाकरे गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागतील आणि त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांकडून प्रस्ताव मागवलाय.
2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि MIMची आघाडी होती. त्यावेळी MIMनं औरंगाबादची एकच जागा लढली होती आणि ती जिंकलीही होती. तर वंचितनं 47 जागा लढल्या होत्या. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर ठाकरेंकडे किती जागा मागणार, हे पाहणं महत्वाचं असेल.