राष्ट्रवादीच्या वाट्याला किती मंत्रीपद येतील? काय म्हणाले सुनील तटकरे

| Updated on: Dec 02, 2024 | 7:13 PM

राज्यात ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपद येतील याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काय माहिती दिलीये जाणून घ्या.

राष्ट्रवादीच्या वाट्याला किती मंत्रीपद येतील? काय म्हणाले सुनील तटकरे
Follow us on

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळाले आहे. २३ तारखेला निकाल लागल्यानंतर आज जवळपास ९ दिवस झाले आहेत तरी मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचं ट्विट केले होते. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत. असं असलं तरी भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस कायम आहे. जरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव आघाडीवर असलं तरी देखील भाजपच्या ४ तारखेलाच्या विधीमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होता याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे देखील सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या वाट्याला देखील मंत्रिपद येणार आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदे यांनी आपला दावा सोडलाय. भाजपचे मोठे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीने आधीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आहे.

भाजपकडून नेहमीच्या पद्धतीनुसार २ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात भाजपच्या आमदारांची बैठक होईल. ज्यामध्ये गटनेता ठरवला जाईल.

राष्ट्रवादीच्या वाट्याला किती मंत्रीपद?

सुनील तटकरे यांनी म्हटले की, ‘५ डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी होईल. पण आमच्या वाट्याला किती मंत्रिपद येतील याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची विधिमंडळ नेते पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं ते ५ तारखेला शपथ घेतील. अजित पवार दिल्लीला येणार याबाबत मला अद्याप कुठलीही कल्पना दिली नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे पण मला कुठल्याही बैठकीबद्दल माहित नाही. मुंबईतून निघाले म्हणजे ते दिल्लीला येणार असं नसतं.’

मुख्यमंत्री भाजपचाच – तटकरे

मुख्यमंत्री भाजपचा होईल हे परवा अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निश्चित झालं आहे. कोणत्या पक्षाला किती आणि कोणती खाती असतील यावर अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. महायुतीची पुन्हा दिल्लीत बैठक होईल याबाबत मला कुठीलीही वास्तविकता माहीत नाही. भाजपची विधिमंडळ दलाची बैठक परवा होईल. त्यानंतर हवं तर काही चर्चा होईल.

तिन्ही पक्ष एकत्र पुढे जाणार

अमित शाह यांच्यासोबत अजित पवार यांची स्वतंत्र बैठक होण्याची गरज मला वाटत नाही. दोन पक्ष पुढे जातील या बातमीत अजिबात तथ्य नाही. आम्ही तिन्ही पक्ष म्हणूनच आगामी काळात पुढे जाणार आहोत. एकनाथ शिंदे यांची नाराजी कोणावर असण्याच प्रश्न नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यामुळं या चर्चा तथ्यहीन आहेत.