मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी राजेश टोपे यांनी काही महत्वााची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्या सोबत व्हिसीद्वारे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला राज्यातले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच टास्क फोर्सचे अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.
नव्या व्हेरिएंटबाबत बैठकीत चर्चा
ओमिक्रोन या व्हेरिएंटचा राज्याला किती संभाव्य धोका आहे? त्याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील? याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे काही महात्वाचे निर्णयही जाहीर करु शकतात. तसेच बैठकीबाबत राज्यातील लसीकरणाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यविषयक उपाययोजनाबाबत चर्चा होणार
राज्याला धोका वाढल्यास बेड्सचं नियोजन कसं असेल याबाबतही या बैठकीत चर्चा होणाार आहे. तिसरी लाट आल्यास मोठ्या प्रमाणात बेड्सची गरज भासू शकते, त्याची व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. एकंदरीतच कोरोनाची तिसरी लाट आल्यास आरोग्य यंत्रणा कशी सज्ज करता येईल याबाबत ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण बैठक आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी लावण्याची गरज
सुरूवातीला कोरोना बाहेरील देशातूनच भारतात आला आणि आता हा नवा व्हिरिएंट विदेशातच आढळला आहे. त्याला भारतात येण्यापासून रोखायचं असेल तर आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी लावण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. सुरुवातीला दक्षिण अफ्रिकेत आढळलेला हा नवा व्हेरिएंट आता युरोपियन देशातही वेगाने परसत चालला आहे, हीच बाब लक्षात घेऊन जगभरातील सरकारे अलर्ट मोडवर आली आहेत. राज्यातही लवकर मोठे निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे.