लोकशाही गेली तर मी बोलू शकणार नाही, तर मला तुरुंगात… सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान

| Updated on: May 04, 2024 | 5:13 PM

काँग्रेसच्या मांडीवर आम्ही जन्मलो. इथेच वाढलो, खेळलो, काँग्रेसला सोडून बिलकुल जाणार नाही, असं माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावर शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकशाही गेली तर मी बोलू शकणार नाही, तर मला तुरुंगात... सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
sushilkumar shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजप सत्तेवर आल्यावर देशातील लोकशाही धोक्यात येणार आहे. देशात हुकूमशाही येणार असल्याचं विरोधक वारंवार म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. देशात हुकूमशाही येऊच शकत नाही, असं मोदी म्हणाले. मात्र, तरीही विरोधकांकडून त्याबाबत वारंवार बोललं जात आहे. आज देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. देशात हुकूमशाही आली तर मी बोलू शकणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सोलापूर येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपण दहा वर्ष मोठ्या मतांनी निवडून दिलं. त्यांना आता सत्तेची चटक लागली आहे. या निवडणुकीत हुकूमशाह विरुद्ध लोकशाही अशी लढत होणार आहे. मोदींना हुकूमशाही आणायची आहे. आपल्या देशातून लोकशाही गेली तर मी बोलू शकणार नाही. आम्ही तर मंत्री होतो. आम्हाला सर्वात आधी जेलमध्ये जावं लागेल, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

मोदी म्हणतात ते झूठ…

काँग्रेसने कर्नाटकात फतवा काढून रातोरात आरक्षण बदललं. काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी आरक्षणात घेतलं आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी यांचा हा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी खोडून काढला आहे. मोदी म्हणतात ते सगळं झूठ आहे. आम्ही म्हणतो ते खरं आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

ठाकरेंचं महत्त्व लक्षात आलंय बहुधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते त्यांचं कामच आहे. त्यामुळे विश्वास ठेवण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचं महत्त्व नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलं का? असा सवाल केला असता असं दिसतंय, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही कुठेच जाणार नाही

निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यांच्या विधानावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मांडीवर आम्ही जन्मलो. इथेच वाढलो, खेळलो, काँग्रेसला सोडून बिलकुल जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.