Pooja Khedkar Reaction after police inquiry : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आता नुकतंच पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी चौकशी केली आहे. पूजा खेडकर यांची साधारण 3 तासांपासून चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर पूजा खेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी पोलिसांनी माझी चौकशी केली नाही, तर मी पोलिसांना बोलावलं होतं, असे स्पष्टीकरण आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिले होते.
पूजा खेडकर यांच्या चौकशीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या चौकशीत नेमकं काय काय घडलं याबद्दल वक्तव्य केले. “मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा याची चौकशी पूर्ण होईल, तेव्हा सर्व गोष्टी निश्चितच समोर येतील. या प्रकरणात काहीही लपून राहणार नाही. जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर येईल”, असे पूजा खेडकर यांनी म्हटले.
“या समितीच्या चौकशीत कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही. त्यामुळे यातील सर्व गोष्टी या गोपनीय ठेवल्या जातात. त्यामुळे याबद्दलची माहिती मिडिया किंवा सर्वसामान्य लोकांना दिली जात नाही. त्यामुळे मी याबद्दल काहीही सांगू शकत नाही. मी माझे सर्व दस्तावेज आणि पुरावे दिलेले आहेत. त्याआधारे ते जो काही असेल तो निर्णय घेतील. त्यामुळे आपण समितीच्या निर्णयासाठी थोडावेळ थांबायला हवं. तसेच आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा”, असेही पूजा खेडकर म्हणाल्या.
“याप्रकरणी जे काही असेल ते सर्व समिती समोर येईल. दररोज नवनवीन खोट्या बातम्या समोर येत आहेत. माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामुळे माझी खूप बदनामी होत आहे. माझी मीडियातील प्रतिनिधींना विनंती आहे की एक जबाबदार मिडिया म्हणून तुम्ही वागा. माझा मीडियावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही माहिती मिळेल, ती चुकीची माहिती पसरवू नका. याबद्दल जो काही निर्णय होईल, त्याची पहिली कॉपी मी स्वत: तुम्हाला देईन”, असेही पूजा खेडकर यांनी सांगितले.
दरम्यान पूजा खेडकर यांनी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याचीही सखोल चौकशी होणार आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यातर्फे ही चौकशी केली जाणार आहे. याबद्दलची चौकशी करुन केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. आयकर विभागाकडून खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाचीही पडताळणी केली जाणार आहे. आयटीआरद्वारे ही पडताळणी करण्यात येणार आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आयकर विभागाकडून याबद्दलची माहिती घेतली आहे.