मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्बंधांबाबत सविस्तर भूमिका मांडली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसोबत ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे सरकारनं खबरदारी घेत निर्बंध जारी केले असल्याचं त्यांनी म्हटलंय. या निर्बंधांचा कुणीही गैरअर्थ काढू नये, असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. दरम्यान, तिसरी लाट जर आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
फ्रान्स, ब्रिटनमध्ये ज्या प्रमाणे कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहायला मिळत आहे, त्यानुसार आताच जर आपण महाराष्ट्रात खबरदारी घेतली नाही, तर रुग्णवाढीचा दर आणखी वाढण्याची भीती असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गर्दी रोखण्यासाठीच निर्बंध जारी केले असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. वर्षाअखेरीस होणाऱ्या पार्ट्या, त्याचप्रमाणे उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू नये, यासाठी रात्रीच्या वेळीत जमावबंदीसारखा निर्णय घेत असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय. याचं पालन केलं गेलं नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं होतं, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय.
ज्या प्रमाणे ओमिक्रॉनच्या संसर्गाचं प्रमाण पाहायला मिळालंय, त्यावरुन राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. जर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ही ओमिक्रॉनचीच राहिल, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दुपटीनं रुग्ण वाढण्याचं प्रमाण असं सुरु राहिलं, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं आहे. परदेशात लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ऑमिक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
दरम्यान शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.
संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी
लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 क्के यापैकी जे कमी असेल ते.
इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करताना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.