पुणे : महाराष्ट्रात खूप उदो उदो झालेल्या समुद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. समुद्धी महामार्गाने अपघातांचा अनुभव घेतला आहे. समृद्धी महामागार्वर सकाळी झालेला अपघात ही दुःखद घटना आहे. या महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात. हे गेले काही महिने बघायला मिळतं. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे.
समुद्धी महामार्गाचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, तो तयार केला त्यांना ते लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले. 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. पण, असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ, कर्तबगार लोकांची समिती तयार करावी असे पवार म्हणाले.
तज्ज्ञ लोकांच्या समितीने रस्त्याची कमतरता शोधून काढावी. रस्त्याची पाहणी करायला हवी. त्यासाठी विशेष पथक नेमायला हवं. अपघातग्रस्त भाग अशा खुणा रस्त्यावर बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता असल्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे. लोकांचे प्राण हे वाचवायला हवेत असे पवार यांनी सांगितले.
राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे का असा सवाल करून ते म्हणाले, महिलांवर हल्ले होत आहेत. पुण्यात मुलीच्या हत्येचा प्रयत्न होतो. कोयता गँग ही या राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. महाराष्ट्रात गुंतवणूकदार येत आहेत अशा बातम्या येतात. पण, महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जात आहेत. राज्य कसं चाललं यांचं उत्तम उदाहरण पहायला मिळतं. घाईघाईत प्रकल्प मंजूर करण्याचे निर्णय घेतले जातात. मी मुख्यमंत्री असताना दोन ते तीन तास बाहेरील गुंतवणूकीवर चर्चेसाठी द्यायचो असे पवार यांनी सांगितले.
माझी गुगली फडणवीस यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना गुगली टाकलेली कसे कळणार? ते बॉलरला माहित असते. मी जे सांगितले ते अर्धसत्य होते असे त्यांचं म्हणण असेल. आमची भूमिका दोन दिवस आधी कळल्यानंतर तुम्ही शपथविधीचा उद्योग दोन दिवसांनी का केला? असा सवाल पवार यांनी केला.