पुणे : मार्च आणि एप्रिल महिना उन्हाचा तडाखा आणि पाऊस असे वातावरण होते. मे या महिन्यात राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत होता. मे महिन्यात अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांवर आहे. यामुळे उन्हाळा जाणवत नाही. हवामान विभागानं (IMD) पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी रात्रीही पाऊस झाला. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभर पुणे शहरासह मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
तीन दिवस अवकाळी
पुणे जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवस अवकाळी पाऊस असणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक शहरात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
चक्रीवादळ सक्रीय
आजपासून ९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय होणार आहे. यामुळे देशाच्या पूर्व भागासोबत मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
राज्यात सर्वाधित तापमान सोलापुरात
राज्यात सर्वाधिक तापमान ३८.२ अंश सेल्सियस सोलपुरात होते. मुंबईत ३२.२ तर पुणे शहराचे तापमान ३५.५ अंश सेल्सियसवर गेले होते. मे महिन्याचे ऊन अजूनही राज्यात जाणवत नाही.
पुण्यात पाऊस
पुणे शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस पडला. शहरातील अनेक भागात रात्रभर पाऊस सुरु होता.
तसेच शहरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याकडून शहराला यलो अलर्ट दिला आहे.
भोर तालुक्यात पाऊस
पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसानं तालुक्यातील काही गावांना झोडपून काढलं. तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालं होत. तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पहायला मिळतय.
नाशिकमध्ये पाऊस
नाशिक जिल्हयात रोजच अवकाळी पाऊस हजेरी लावत असून आजही पावसाने देवळा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अर्धातास झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणीच पाणी झाले. या पावसामुळे चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला फटका बसला. अचानक असलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला आहे.