राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात येत्या तीन, चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि घाट भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. येत्या तीन, चार दिवस सर्वच भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई परिसरातील भाग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत 24 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, बीड, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मात्र रेड अलर्ट दिला आहे.
24 Aug, 9.45 am,Possibility of mod to intense rainfall during next 3,4 hrs over Konkan-Goa region including ghat areas & adj areas.
Watch for IMD nowcast for #Mumbai #Thane #Palghar #Raigad #Ratnagiri #Sindhudurg #Goa #ghat_areas_Satara_Kolhapur around.
Next 3,4 days ☔ in Mah pic.twitter.com/NZjs1mHMpb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 24, 2024
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवस जिल्ह्यात कडक उन पडले होते. पावसाने दडी मारल्याने उकाड्याचे प्रमाण देखील वाढले होते. मात्र शुक्रवार रात्रीपासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सह्याद्री पट्ट्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
नांदेडमध्ये आयोजित महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात आली होती. मात्र मोठा पाऊस झाल्याने या ठिकाणी पाणी साचले आणि चिखल देखील झाला. मंडपात मुक्कामी असलेल्या हजारो भाविकांना प्रशासनाने रात्रीतून सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, आणखी दोन दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. त्यामुळे नांदेड शहराजवळच्या कौठा येथील आयोजित मंडपात महाशिवपुराण कथा होणार नाही, अशी माहिती नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. आयोजकांची चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी इतरत्र पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. शेतकऱ्यांनी धानरोवणी आटोपली अशात त्यांना पावसाची अपेक्षा आहे. मात्र मोहाडीसह काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात इतरत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाची वाट बघत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यातील शिवणेमध्ये नदीत दोन तरुण अडकले आहेत. खडकवासला धरणातून पाण्याचा प्रवाह वाढविल्याने नदीपात्रात पाणी वाढले. त्यामुळे हे दोन तरुण अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.